बुधवार, जून 11, 2008

आपलं माणूस

आपलं माणूस असं आपण म्हणतो खरं पण खरोखर माणसं आपली असतात का? खरं तर जो तो फक्त स्वतःचा असतो. मी कोणाला दोष देत नाही. पण मी हे पाहिलंय.

काही काही लोकांचे स्वतःचे आडाखे असतात. ती माणसं काही ठरावीक योजना मनाशी बाळगून लोकांशी नातं जोडतात. अशा लोकांचे विचार आपण सोडून देऊ एकवेळ पण आपली अशी जी माणसं असतात त्यांचं काय ?

आपला भाऊ, इतर नातेवाईक किंवा प्रसंगी आपल्या आयुष्याचा भागीदार हे तरी आपले असतात काय ?

आपण जेव्हा म्हणतो की अमूक एक माणसावर आपला अधिकार आहे तेव्हा आपला खरंच अधिकार असतो का ? जर आपलं त्या माणसा वर प्रेम असेल तर अधिकाराची भाषा कशाला ?

लोकं प्रेमातही गल्लत करतात. ज्या व्यक्तीवर प्रेम करतात त्याला पकडून ठेवायला जातात. माणसाच्या मनावर कधी कब्जा मिळवता येत नाही हे विसरतात. एखादं माणूस जर आपल्यावर प्रेम करत असेल तर ते येतंच आपल्याकडे. आपल्याशिवाय त्या व्यक्तीला आयुष्य निरर्थक वाटतं.

आपण धीर नावाची गोष्ट कधी धरतच नाही.

इंग्लीश मध्ये छान म्हटलंय "If you love someone Set him free, if he comes back; he is yours, if he doesn't, he never was."

आपल्या माणसाला बंदी बनवणारे आपणच असतो. त्याच्या क्षमतेला बंध घालणारे आपणच असतो. मग ह्या साऱ्यांमधून निर्माण होते चीडचीड. त्रागा वाढत जातो. नको त्या गोष्टी बोलल्या जातात. मनं दुखावली जातात.

मग कुणीतरी बहिणाबाई सहज सांगून जाते.
अरे, संसार संसार
नहीं रडन कुढनं
येड्या, गयांतला हार
म्हनूं नको रे लोढन

.

कोई टिप्पणी नहीं: