सोमवार, दिसंबर 15, 2008

दहशतवादाचे मूळ - आपण स्वतः

दहशतवादी आपल्या देशात येऊन दहशत माजवायची हिंमत करतात त्याला कारण आपला नाकर्तेपणाच आहे. एखादी दहशतवादी घटना घडली की फक्त चार दिवस चर्चा करून आपण तो विषय सोडून देतो.

लोकं म्हणतात आपण एकट्याने काय करू शकणार, ही सरकारची जबाबदारी आहे. पण जेव्हा निवडणूका असतात त्यावेळी योग्य उमेदवार निवडून देण्याऐवजी आपण एकतर आळस करतो किंवा आपापल्या आवडत्या पक्षाच्या उमेदवाराला वोट देऊन मोकळे होतो. पण आपण कधीच आपल्या उमेदवारांपर्यंत आपल्या भावना पोहचवत नाही, जाब विचारायचं तर लांबच राहिलं.

सुरक्षे बद्धल तर एवढी अनास्था आहे की विचारता सोय नाही. दहशतवादी घटना घडली की आपण पोलिस, प्रशासन इत्यादींना जबाबदार ठरवून ते कसे ढिसाळपणे काम करतात त्याचीच चर्चा करत राहतो. सुरेक्षेबद्दल आपण स्वतः किती जागरूक आहोत ह्याचा आपण कधीच विचार करत नाही. आपल्याला ट्रेन मध्ये बसताना सीटच्या खाली काही सामान तर नाही हे बघायला लाज वाटते. दुसरा कोणी जर ते करत असेल तर आपण त्याला मूर्ख ठरवून आपण मोकळे होतो. पोलिसांनी सामान चेक केले तर आपल्याला अपमान वाटतो. सुरक्षा रक्षकांनी आपले ओळखपत्र विचारले तर आपल्याला झोंबतं. आपण आपलं सर्वस्व पणाला लावून ह्या गोष्टींना विरोध करतो. मेटल डिटेक्टर मधून जाण्याऐवजी आपण मेटल डिटेक्टरनां चकवून निघून जातो. आपल्या कार्यालयात किंवा जवळपासच्या परिसरात संशयास्पद व्यक्ति दिसली तर आपण त्यांना हटकत नाही किंवा पोलीसांना कळवत नाही. आपल्या शेजारी, भाड्याच्या घरात जर संशयास्पद व्यक्ती राहत असतील तर आपण दुर्लक्ष करून विषय सोडून देतो. किती नागरिकांना पोलीस हेल्पलाईन चे नंबर माहिती आहेत ? ह्या आणि अशाच गोष्टींचा फायदा अतिरेकी घेतात.

खरतंर आपत्कालीन परिस्थिती मध्ये नक्की काय करायचं याचं प्रशिक्षण कोणालाच नाही. सर्व नागरिकांना “नागरी गृहरक्षा दलाचे प्रशिक्षण” अनिवार्य केलं पाहिजे. कमीत कमी स्वतःचा जीव वाचवता जरी आला तरी खुप. तसेच बघ्याची भूमिका न घेता तत्पर ती जागा सोडून पोलिस तसेच प्रशासनाला मदत करावी.

आपण जर सतर्क राहिलो तर ब-याच अंशी दहशतवादी कारवाया करण्यां-यावर बंधन येतील.

कोई टिप्पणी नहीं: